

वसमत ः सिसिआय केंद्रावर खरेदी करण्यात येणाऱ्या कापसासाठी अनेक अडचणी येत होत्या. अवाजवी अटी, नकारात्मक निकष, आर्दता, वजन यासह इतर बाबींमुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले होते. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार राजू पाटील नवघरे यांनी पणन व वस्त्रोद्योग मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन अटी व शर्ती शिथील करण्याची मागणी केली होती. संबंधित विभागाकडून सर्व अटी शिथील करण्यात आल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात वसमत व औंढा नागनाथ तसेच कळमनुरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे. सध्या कापसाची विक्री सुरू असून शेतकरी शासनाने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमतीवर सिसिआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे आपला कापूस विक्री करीत आहेत. परंतू, शेतकऱ्यांना कापूस विक्री दरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही बाब आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या लक्षात येताच त्यांनी बुधवारी पणन व वस्त्रोद्योग मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ सोडविण्याची विनंती केली होती. ना. रावल यांनी तात्काळ संबंधित यंत्रणेला सुचना देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच यापूर्वी प्रतिएकर 5 क्विंटल 20 किलो पर्यंतची मर्यादा खरेदीसाठी ठेवण्यात आली होती. ती रद्द करून आता थेट 9 क्विंटल 47 किलोपर्यंत करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस सिसिआय खरेदी केंद्रावर विकता येणार आहे. आमदार राजू नवघरे यांनी कापूस खरेदीसंदर्भात पाठपुरावा केल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.