

Queues stretching up to four kilometers at the Sai Petrol Pump in Hatta, Vasmat Taluka
हट्टा : पुढारी वृत्तसेवा
हिंगोली-परभणी रोडवरील साई पेट्रोल पंपावर आज पहाटे चार वाजल्यापासून डिझेलसाठी शेतकरी व ट्रॅक्टर चालकांची प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेतीच्या मशागतीची कामे वेगात सुरू असताना अचानक इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. डिझेल मिळवण्यासाठी तब्बल चार किलोमीटरपर्यंत ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे इंधन टंचाईची तीव्रता दिसून येत आहे.
विशेष म्हणजे मागील काही दिवसांमध्ये डिझेल दरामध्ये चौथ्यांदा वाढ झाल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. वाढत्या इंधन दरामुळे शेती मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असून ट्रॅक्टर चालक आणि शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
पहाटेपासूनच ट्रॅक्टर चालकांनी पेट्रोल पंप परिसरात ठिय्या मांडला होता. अनेक शेतकरी रात्रीपासूनच आपल्या ट्रॅक्टरसह रांगेत उभे असल्याचे दिसून आले. उन्हाचा तडाखा वाढत असतानाही डिझेल मिळेल या आशेने शेतकरी तासन्तास प्रतीक्षा करत होते. काही ठिकाणी रांगेवरून किरकोळ वाद झाल्याची माहितीही समोर आली आहे.
सध्या खरीप हंगामासाठी नांगरणी, पेरणीपूर्व मशागत आणि इतर शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. अशा परिस्थितीत डिझेलचा तुटवडा आणि वारंवार होणारी दरवाढ यामुळे शेतीची कामे खोळंबली असून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. “एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे डिझेलचा तुटवडा, त्यामुळे शेती करायची कशी?” असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
प्रशासनाने तात्काळ अतिरिक्त डिझेल पुरवठा उपलब्ध करून द्यावा तसेच वाढत्या इंधन दरावर नियंत्रण आणावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.