हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : सरकारी नोकरी सोडून लोकसभेच्या आखाड्यात उतरलेल्या रामदास पाटील – सुमठाणकर यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांच्या घरात असून ते लखपती आहेत तर त्यांच्या पत्नी वर्षा पाटील या कोट्यधीश आहेत. उमेदवारी अर्जासोबत अपक्ष उमेदवार रामदास पाटील यांनी दाखल केलेल्या सांपत्तिक विवरणात त्यांचे मागील पाच वर्षांची सरासरी काढली असता वार्षिक उत्पन्न ५ लाख १९ हजार ३१४ इतके आहे. त्यांच्या पत्नी वर्षा पाटील यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २ लाख ४८ हजार ७१४ इतके आहे.
जंगम मालमत्तेच्या विवरणात स्वत: रामदास पाटील यांच्याकडे असलेल्या रोख रक्कमेसहित दागिने, बँकेतील ठेवी, विविध बंधपत्रे व अन्य गुंतवणूक असे एकंदरीत २४ लाख ५६ हजार ६९६ रुपये इतकी आहे. तर वर्षा पाटील यांची जंगम मालमत्ता ५१ लाख १५ हजार २०५ एवढी आहे. स्थावर मालमत्तेमध्ये विविध ठिकाणी असलेल्या शेतजमीनी व प्लॉट असे एकुण ९ लाख १० हजार रुपयांची मालमत्ता रामदास पाटील यांच्या नावाने आहे तर वर्षा पाटील यांच्या नावाने २ कोटी ९९ लाखाची स्थावर मालमत्ता आहे.
रामदास पाटील यांच्यावर कोणत्याही बँकेचे अथवा वित्तीय संस्थेचे कर्ज नसून असुरक्षीत कर्जाचा आकडा मात्र ६२ लाख ७७ हजार १७७ एवढा आहे. वर्षा पाटील यांच्यावर असलेल्या ३२ लाख ५८ हजार २५६ रुपयांच्या असुरक्षीत कर्जासहित बँक व वित्तीय संस्थांचे एकूण देणे मिळून १ कोटी १९ लाख ३९ हजार १२२ रुपये कर्ज आहे. दोघांकडे कोणत्याही प्रकारची प्रलंबीत शासकीय देणे नसल्याचे बंधपत्रात नमुद आहे. रामदास पाटील – सुमठाणकर यांनी कला शाखेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून या सोबतच त्यांनी डी.एड्. ही केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण करून आठ वर्षे विविध नगर परिषदांच्या मुख्याधिकारी पदी काम केलेले आहे.
अपक्ष उमेदवारी दाखल केलेले भाजपचे नेते रामदास पाटील -सुमठाणकर हे लखपती असून त्यांच्या पत्नी वर्षा पाटील ह्या मात्र कोट्यधीश आहेत. रामदास पाटील यांच्याकडे जंगम व स्थावर मालमत्ता मिळून एकूण ३३ लाख ६६ हजार रुपये आहे. तर वर्षा पाटील यांच्याकडे ३ कोटी ५० लाख १५ हजार इतकी मालमत्ता आहे. रामदास पाटील यांचे वार्षिक उत्पन्न मागील पाच वर्षांच्या सरासरी नुसार ५ लाख १९ हजार इतके असून वर्षा पाटील यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षाही कमी आहे.
हेही वाचा :