

Pradnya Satav's entry into the BJP has been welcomed in rural areas.
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांचा नुकताच मुंबई येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रज्ञा सातव यांचा झालेला प्रवेश हिंगोली जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत.
भविष्यात जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे बळ वाढणार आहे. प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशाचे ग्रामीण भागातून स्वागत होत असून श्रीम येणाऱ्या काळात अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
मागील पाच दशकांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सातव घराण्याचे वर्चस्व राहीले असल्याने त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी आजही जोडलेली आहे. प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश येणाऱ्या काळात भाजपच्या संघटनवाढीसाठी महत्वाचा ठरणार आहे. गुरुवारी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने डॉ. प्रज्ञा सातव यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
या सोहळ्यास भाजपचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावून डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्या मागे बळ उभे करण्याचे संकेत दिले. सत्कार सोहळ्यात बावनकुळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, दिवंगत खासदार राजीव सातव यांनी जिल्ह्याच्या विकासाला गती दिली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत प्रज्ञाताई सातव या काम करीत आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी आमचे पूर्ण सहकार्य व पाठिंबा राहील असा शब्द बावनकुळे यांनी यावेळी बोलताना दिला.
ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू : बोर्डीकर
सत्कार सोहळ्यात बोलताना राज्यमंत्री तथा हिंगोलीच्या संपर्क मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी सांगितले की, सातव घराण्याशी आमच्या कुटुंबीयांचे पूर्वीपासून स्नेहाचे संबंध असून आगामी काळात जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही एकत्रित काम करून प्रज्ञाताई सातव यांना कामासाठी लागणारे सहकार्य करू.