

औंढा नागनाथ : परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ औंढा नागनाथ येथे मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी औंढा नागनाथ येथील बौद्ध समाजाचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळाले.
मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून काढून बस स्थानक परिसरात रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जी.डी. मुळे, सुमेध मुळे, वसंतराव मुळे, किरण घोंगडे, कपिल खंदारे, प्रदीप कनकुटे यांच्यासह बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान पोलिस निरीक्षक जी.एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
परभणी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ औंढा वकील संघाकडून निषेध करण्यात आला. यावेळी प्रशासनास निवेदन देऊन निषेध करण्यात आला. सदर घटनेचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, सदर व्यक्तीविरुद्ध देशद्रोहाचा खटला जलदगती न्यायालय स्थापन करून चालविण्यात यावा अशी मागणी औंढा नागनाथ येथील वकील संघाकडून करण्यात आली आहे. निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रामजी कांबळे, उपाध्यक्ष अॅड. विनोद मुखमहाले, कोषाध्यक्ष किशन वाघमारे, अॅड. एस एन देशपांडे, जी पी श्रीखंडे, पी डी पोले, एम. व्ही. मगर, ए.व्ही. ढोबळे, अॅड. काजी, व्ही. जी. घनसावंत, आय.जे. शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.