

One village, one Ganpati concept in 45 percent of villages
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात एक गाव एक गणपती संकल्पना राबवून समाजप्रबोधनाचे कार्यक्रम घेण्याच्या पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आवाहनाला ४५ टक्के गावांनी प्रतिसाद दिला असून जिल्ह्यातील ७१० पैकी तब्बल ३१३ गावांमधून एक गाव एक गणपती हि संकल्पना राबवण्यात आली आहे. यामुळे गावात एकोपा राहण्यास मदत होणार असून पोलिसांचाही बंदोबस्ताचा ताण हलका होणार आहे.
जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, अंबादास भुसारे यांनी ठिकठिकाणी शांतता समितीच्या, गणेश मंडळांच्या बैठका घेऊन सण, उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले.
या शिवाय एक गाव एक गणपती हि संकल्पना राबवून गावात समाज प्रबोधनाचे उपक्रम राबवण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी केले होते. मागील वर्षी ३०५ ठिकाणी हि संकल्पना राबवण्यात आली. मात्र यावर्षी यामध्ये वाढ करावी असे आवाहन त्यांनी केले होते. दरम्यान, पोलिस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ७१० पैकी ३१३ गावामधून एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली आहे. या ठिकाणी एकच गणेशमूर्ती स्थापना करण्यात आली आहे.
या गावातून एकात्मतेचा संदेश देत समाज प्रबोधनाचे उपक्रम राबवले जाणार आहेत. या उपक्रमामुळे गावातील एकोपा कायम राहणार असून गावात शांतता राहण्यास मदत होईल या शिवाय पोलिस बंदोबस्ताचा ताण देखील हलका होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात औंढा पोलिस ठाण्यांतर्गत ६७, कळमनुरी ३७, सेनगाव २०, आखाडा बाळापूर ४०, हट्टा ५, कुरुंदा १९, हिंगोली ग्रामीण ३४, गोरेगाव १८, नीं १०, बासंबा ४०, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत २३ गावांमधून एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली आहे.