

One and a half lakh devotees had the darshan of Vighnaharta Chintamani
हिंगोली, पुढारी, वृत्तसेवा : येथील नवसाला पावणारा विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीचे शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दीड लाखापेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले. अनेक राज्यांमधून भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. भाविकांसाठी सुमारे ७० पेक्षा अधिक ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मोदकाचा गणपती म्हणून प्रसिध्द आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोदक घेण्यासाठी भाविक येतात. मात्र यावर्षी संस्थानच्या वतीने गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मोदकाचे वाटप केले. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच भाविक दर्शन रांगेत उभे होते. शनिवारी पहाटे चार वाजता गणपतीच्या मुर्तीला अभिषेक व महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
यावेळी भाविक व संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी सहा वाजल्या पासून गर्दीमध्ये मोठी वाढ झाली. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, तेलंगणा राज्यातून भाविक दर्शनासाठी आले होते. रामलिला मैदानावरील वाहनतळ खाजगी वाहनांनी भरून गेले होते. दरम्यान, हिंगोली शहरात दाखल झालेल्या भाविकांना चहा, पाणी, नाश्ता, भोजन, दुधाची व्यवस्था दानशूरांच्या वतीने करण्यात आली होती.
सुमारे ७० पेक्षा अधिक ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. हिंगोली शहर भाविकांच्या गर्दनि फुलून गेले होते. भाविकांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य पथक तैनात करण्यात आले होते. या शिवाय गर्दीमध्ये अनुचीत प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपाधिक्षक आंबादास भुसारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. शहरात रात्री उशीरापर्यंत भाविकांनी चिंतामणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सुमारे दिड लाखापेक्षा अधिक भाविकांनी गणपतीचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.