गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे दोन मानाच्या गणपती विसर्जन सह इतर सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या असुन दोस्ताना सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या वतीने दैत्य भवानी मिरवणुकीने दिडशे पावणे दोनशे वर्षांची परंपरा कायम ठेवत गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
गोरेगाव राजकीय दृष्ट्या पुढारलेलं गाव गावात दोन मोठे गट कावरखे व खिल्लारी यांचे मानाचे गणपती आहेत. दोस्तांना सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या वतीने माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, रणजीत पाटील, द्विजराज पाटील, वरुण पाटील यांच्या उपस्थितीत श्रींची महाआरती खिल्लारी हनुमान मंदीरात करण्यात आली होती.
दिडशे वर्षांची परंपरा कायम जोपासत दैत्य भवानी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. श्रींच्या महाआरती नंतर गावात दैत्य भवानीचा सजीव देखावा करत बोल अंबिका माता की जय या घोषणेने मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावर खिल्लारी हनुमान मंदिर - कामठा चौक- एकता नगर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- कावरखे हनुमान मंदिर बाजारपेठ मार्गावर ठिकठिकाणी दैत्य भवानी चा कार्यक्रम संपन्न झाला.
दैत्य भवानी चा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील भाविकांसह महिला बालगोपाळांनी हजेरी लावली होती. दोस्तांना सार्वजनिक गणेश उत्सव समितीने गेल्या दिडशे वर्षांची परंपरा कायम जोपासत गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये दैत्य च्या भुमिकेत विनोद डिगांबर खिल्लारी तर भवानीच्या भुमिकेत सुर्यकांत वसंतराव खिल्लारी होते.
कावरखे गणेश उत्सव समितीच्या वतीने ढोल ताशे च्या गजरात मिरवणूक काढली होती. तर जय बिरसा मुंडा गणेश उत्सव समितीने पारंपरिक लोकनृत्य लोकसंगीत वाद्यांच्या तालावर उपस्थितांची मने जिंकली.
गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी गोरेगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनोद झळके यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विसर्जनस्थीत खदानवर विद्युत पुरवठा उपलब्ध करण्यात आला होता.