

Chandrashekhar Bawankule action warning
औंढा नागनाथ : पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यामुळे महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे.
महसूल विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांतील तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक तसेच भूमी अभिलेख विभागाचे जमाबंदी आयुक्त व संचालक यांच्या अधिनस्थ काही अधिकारी वारंवार विनापरवानगी मुख्यालयात गैरहजर राहत असल्याची तक्रार मंत्री बावनकुळे यांच्याकडे आली होती. कर्मचारी जागेवर नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे नाहक प्रलंबित राहत होती. तक्रारींची शहानिशा केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने महसूलमंत्र्यांनी गंभीर दखल घेत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे आता मुव्हमेंट रजिस्टर हे वापरात येणार असे दिसून येत आहे. कारण प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये एक मुव्हमेंट रजिस्टर कायमस्वरूपी ठेवलेले असते. जे सर्रासपणे कोणालाही उपलब्ध होत नाही. पण मागितल्यास मिळू शकते. सदर रजिस्टर मध्ये कर्मचारी कुठे गेला, तो किती वेळ त्या ठिकाणी राहणार, परत कार्यालयात किती वेळात येणार, शिवाय सदर ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचा जाण्याचा हेतू व उद्देश व परत आल्यानंतर त्याने बजावलेल्या कर्तव्याची दखल सुद्धा या मुव्हमेंट रजिस्टर मध्ये ठेवावी लागते.
शिवाय त्या कर्मचाऱ्याला परवानगी दिलेल्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या व परवानगी लिहून ठेवाव्या लागतात. मात्र पोलीस प्रशासन सोडले, तर कुठल्याही कार्यालयात या रजिस्टरची माहिती कोणीही कर्मचारी देत नाही, हे विशेष. तर अनेक कार्यालयात हे रजिस्टर पडून आहेत. तर अनेक कार्यालयाला रजिस्टरच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निर्णयामुळे मात्र भविष्यात या रजिस्टरचा उपयोग सर्वच कार्यालयातून मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे परवानगीशिवाय कार्यालय सोडण्याच्या नियमामुळे कर्मचाऱ्यांत मात्र गोंधळाचे वातावरण दिसून येत आहे.