

Narsi Namdev Pandharpur Crowd of devotees
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे परतवारीनिमित्त सोमवारी पहाटे अडीच वाजल्यापासून संत नामदेव महाराजांच्या समाधीच्या दर्शनाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत सुमारे ४ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले. त्यामुळे सोमवारी नर्सीमध्ये प्रती पंढरपूर अवतरल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी गेलेले भाविक पंधरा दिवसांनी येणाऱ्या कामिका एकादशीला संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे दर्शनासाठी येतात. या दर्शनानंतरच वारी पूर्ण होते अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या वारीला परतवारी म्हणून ओळखले जाते.
दरवर्षी यावेळी सुमारे ४ लाखांपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन संस्थान प्रशासन, पोलिस प्रशासन व महसूल प्रशासनाने चोख व्यवस्था केली. दरम्यान, रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासूनच भाविक दर्शन रांगेत उभे होते. भाविकांची गर्दी वाढल्यानंतर पहाटे अडीच वाजता दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दर्शनासाठी तीन रांगांनी भाविक मंदिरात येत होते. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम तसेच हरि नामाच्या गजरात भाविक संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत होते. रात्री उशिरापर्यंत ४ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी समाधीचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान, सकाळी सात वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे, संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, भिकाजी कदम, भिकुलाल बाहेती, ओम हेडा, द्वारकादास सारडा, मनोज आखरे, ब्रिजमोहन तोष्- णीवाल, राहुल नाईक यांच्यासह विश्वस्त व भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी चार मंडपाची उभारणी करण्यात आली. तसेच दर्शन रंगेत येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही विविध संघटनांकडून करण्यात आली. १०० क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
भाविकांच्या वाहतुकीसाठी हिंगोली, परभणी, जिंतूर, रिसोड, वसमत आगाराने जादा बसेस सोडल्या. भाविकदेखील मिळेल त्या वाहनाने दर्शनासाठी नसींत दाखल झाले होते. भाविकांच्या गर्दीने नसीं नामदेव येथे प्रती पंढरपूरच अवतरल्याचे दिसून आले.