

60 students infected with scabies
आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : अकळमनुरी तालुक्यातील कुर्तडी येथील सरस्वती विद्यालयातील सुमारे ६० विद्यार्थ्यांना खरूज या संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून अंग खाजवून विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शाळा प्रशासनाने सुरवातीला याकडे दुर्लक्ष केले, मात्र आजारी विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्यावर त्यांना उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना शुक्रवारी शाळेत पाठवून देण्यात आले.
या ठिकाणी एलकेजीपासून ते इयत्ता बारावीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. निवासी वसतीगृहामध्ये काही विद्यार्थी राहतात. मात्र विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांकडे शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप केला जात होता. अस्वच्छता व इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सुरु असलेला पावसाळा व परिसरातील अस्वच्छता यामुळे विद्यार्थ्यांना सर्दी, ताप, खोकला सुरु आहे. या शिवाय ६० विद्यार्थ्यांना खरूज या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे.
विद्यार्थी अंग खाजवून त्रस्त असताना शाळा प्रशानाने त्यांना रामेश्वर तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. त्या ठिकाणी उपचार करूनही विद्यार्थ्यांच्या प्रकृतीमध्ये फरक पडत नसल्याने त्यांना शुक्रवारी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना शाळेकडे पाठविले. या बाबत शाळा प्रशासनाचे सोळंके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ६० विद्यार्थ्यांना खरुज आज- ाराची लागण झाली होती. खरूज हा संसर्गजन्य आजार असून पावसाळी वातावरण व ओलाव्यामुळे त्वचेमध्ये इन्फेक्शन होऊन हा आजार होतो. एका पासून दुसर्याला हा आजार पसरण्याची शक्यता जास्त असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.