

Kalmanuri employee steals from jewellery shop
कळमनुरी: शहरात दुकानातील नोकरानेच 20 लाखांचा मुद्देमाल पळवल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी ( दि. 13) गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच नोकर फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम उदावंत यांचे कळमनुरी येथील पोस्ट ऑफीस रोड भागात सोने चांदीचे दुकान आहे. या ठिकाणी सोने, चांदी विक्री सोबतच मोड देखील खरेदी केली केला जाते. व्यापारी शाम उदावंत यांना सतत बाहेरगावी जावे लागत असल्यामुळे त्यांनी सन 2021 पासून दुकानात नदीम पठाण (रा. मसोड, ता. कळमनुरी) यास कामासाठी ठेवले होते. व्यापारी शाम यांच्या सततच्या प्रवासामुळे दुकानातील सर्व व्यवहार नदीम हाच पहात होता.
दरम्यान, नदीम याच्यावर विश्वास ठेऊन व्यापारी शाम यांनी कधीही हिशेब जुळवला नाही. मात्र मागील काही दिवसांत त्यांना शंका आल्यामुळे त्यांनी हिशेब तपासण्यास सुरवात केली. यामध्ये नदीम याने ता. 1 सप्टेंबर 25 ते ता. 29 सप्टेंबर 25 या कालावधीतच दुकानातील हिशेब तपासणी केली असता त्यात 10 लाख रुपयांची रक्कम व सुमारे 10 लाख रुपये किंमतीचे मोड आलेले सोन्या चांदीचे दागिने कमी असल्याचे दिसून आले.
या प्रकरणी व्यापारी शाम यांनी कळमनुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये नदीम पठाण याने 10 लाख रुपये व मोडी मध्ये आलेले 10 लाख रुपयांचे दागिने असा 20 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे नमुद केले. यावरून पोलिसांनी नदीम पठाण याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच नदीम फरार झाला असून पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, जमादार गजानन होळकर पुढील तपास करीत आहेत.