

कळमनुरी पंचायत समितीच्या नुतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी दि.12 आयोजित करण्याता आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याकडे पाठ फिरवली. परंतु, उद्घाटन सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या या कोनशिलेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विधान परिषदेच्या आमदारांचा नामोल्लेख टाळल्याने जिल्हा परिषद प्रशासन अडचणीत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील दोन महिन्यांपुर्वीच इमारतीचा वापर सुरू झाला असताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट घालण्यामागे जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांचा नेमका हेतू काय होता यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
6 कोटी रूपये खर्च करून कळमनुरी येथील पंचायत समितीची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत दोन महिन्यांपुर्वीच कामकाज देखील सुरू झाले असताना अचानक जिल्हा परिषद व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कावड यात्रेसाठी हिंगोली दौर्यावर येत असल्याचे जाहीर झाल्यानंतर रातोरात नव्या इमारतीमध्ये कोनशिला बसवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे निश्चित झाले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत दौर्यात केवळ कावड यात्रेत मुख्यमंत्री सहभागी होतील असा उल्लेख होता. त्यामध्ये कुठेही पंचायत समितीच्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहतील असा उल्लेख नव्हता. तरी जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह आमदार संतोष बांगर, विधान परिषदेच्या सदस्या डॉ. प्रज्ञा सातव, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार तान्हाजी मुटकुळे यांची नावे टाकण्यात आली.
तर विनीतमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदिप मुळे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. परंतू पदवीधर आमदार सतीश चव्हाण व शिक्षक आमदार विक्रम काळे यांचे नाव मात्र कोनशिलेवर टाळण्यात आले. अजित पवार गटाचे हे दोन्ही आमदार सत्ताधारी असताना देखील त्यांचे नाव कोनशिलेवर नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रोटोकॉलनुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघातील आमदारांच्या नावाचा उल्लेख असणे गरजेचे असताना देखील त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे भविष्यात जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. आमदार संतोष बांगर यांनी मात्र कावड यात्रेच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन करीत अधिकार्यांची लाज राखली. परंतू खासदार नागेश पाटील आष्टीकर, हिंगोलीचे आमदार तान्हाजी मुटकुळे, वसमतचे आमदार राजू पाटील नवघरे, विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.