

वसमत ः नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी आमदार राजूभय्या नवघरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत उपाययोजना करण्याची मागणी केली. अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी दिल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही असे मत त्यांनी व्यक्त करीत सहकार मंत्र्यांकडे सरसगट कर्जमाफीची मागणी केली.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आ. नवघरे यांनी वसमत विधानसभेतील विकास कामांसह जिल्ह्यातील विविध मुद्दे उपस्थित करीत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. शनिवारी आ.नवघरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस पडला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने मदत जाहीर केली असली तरी शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तात्काळ सरगसट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना संरक्षक भिंतींसाठी निधी उपलब्ध करावा, ग्रामीण भागातील युवा पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. शालेय विद्यार्थी देखील नशेच्या आहारी जात आहेत. यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्त संचार आढळून आला आहे. यावर ठोस पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथीमार्फत भेटणारी 12 हजार रूपये शिष्यवृत्ती योजना चालू ठेवावी, रोजगार हमी योजनेच्या चालू असलेल्या कामात वाढ करून सिंचन विहिरी, गोठे, पाणंद रस्ते या योजनांचा व्यक्तिगत योजनेत समावेश करावा, भारतीय दिव्यांग महिला संघाची उपकर्णधार गंगा संभाजीराव कदम हिची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे सरकारने तिला शासकीय नोकरी द्यावी तसेच वसमत येथील तालुका कृषी कार्यालयाची इमारत तत्काळ मंजूर करून पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली.
शेतीमालाच्या दरावर व्यक्त केली चिंता
मागील पंधरा वर्षांपासून सोयाबीन, कपाशी यासह इतर पिकांची किंमत जैसे थे आहे. परंतु, खते व कीटकनाशकांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किंमत मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त दर मिळावा, अशी मागणी करत सातत्याने शेतीमालाच्या दरात होत असलेल्या घसरणीवर आमदार नवघरे यांनी चिंता व्यक्त केली.