

malfeasance of Rs 35 crores in Hingoli Mahila Urban
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा महिला अर्बन क्रेडिट सोसायटीमधील ३५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ३३ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शहरातील मोंढा भागात २०१८ साली महिला अर्बन क्रेडिट सोसायटी स्थापन करण्यात आली होती. या सोसायटीमध्ये सर्व महिला संचालक आहेत. सोसायटीमध्ये ग्राहकाकडून व्याजदर जादा देण्याचे सांगत ठेवी ठेवून घेण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम परत देण्यात आली नाही.
त्यामुळे ठेवीदारांनी वेळोवेळी बँक प्रशासनाकडे चकरा मारूनही त्यांना रक्कम देण्यात आली नाही. या प्रकारामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अर्पित बगडीया यांनी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये बँकेच्या संचालकांसह, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ एप्रील २०१८ ते ३१ मार्च २०२४ या कालावाधीतील ठेवीची रक्कम परत न करता ३०.७८ कोटी रुपयांची फसवणूक केली तसेच ४.४३ कोटी रुपयांच्या रकमेचे आर्थिक नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद केले.
यावरून पोलिसांनी सोसायटीच्या अध्यक्षा रोहिणी खर्जुले, उपाध्यक्षा सुमित्रा डिडाळे, सचिव अश्विनी महालनकर, भारती महालनकर, विना भट, रागीणी खर्जुले, सुनीता गुंडेवार, अश्विनी राहुल महालनकर, पलक खर्जुले, मनिषा बिनोरकर, संचिता मुधोळकर, प्रीती बुरसे या महिला संचालकांसह जयेश खर्जुले, पासिंग अधिकारी दिनेश आनेकर, श्रीपाक आगदिघे, मोनाली अंबेकर, राजश्री पांगे, अजिंक्य खर्जुले, प्रेरणा उन्हाळे, गजानन मापारी, सय्यद माजीद, रामदास कुंडकर, अनुप्रिया धुडकेकर, प्रितीया परतवार, ज्योती गंगावणे, संजय बुरसे, नेहा गवई, नारायण भुरभुरे, दिव्या खर्जुले, निवृत्ती कुंडकर, दिगंबर भोयर यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.