

हिंगोली : राज्य शासनाकडून मागील आठ महिन्यांपासून विविध योजनेच्या विकास कामांचे देयके अदा करण्यास निधी दिला नाही. आता देयक नाही तर कामही नाही असे फलक घेऊन कंत्राटदार संघटनेने मंगळवारी (दि.19) जेसीबी व मिक्सर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले.
कार्यालयासमोर धरणे या संदर्भात जिल्ह्यातील कंत्राटदार संघटनेचे निश्चल यंबल, प्रदीप सोनी, मयुर कयाल, पी. पी. मुळे, गुलाम कुरेशी, ए. आर. खान, नईम खान, संतोष बांगर, योगेश लोंढे, भागवत भोयर, गजानन कदम, सचिन कातोरे, कैलास बुळे, बाळू गव्हाणे, भागोराव राठोड, शंकर कोरडे, सुजीत विडोळकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.19) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
राज्य शासनाकडून मागील आठ महिन्यांपासून विविध योजनांच्या कामासाठी निधी देण्यात आलेला नाही. यामध्ये प्रामुख्याने जल जीवन मिशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंपदा विभाग, पर्यटन विभाग, समाज कल्याण विभागाच्या कामांचा समावेश आहे. यामध्ये कंत्राटदारांनी अनेक कामे काही प्रमाणात पूर्ण केली आहेत. मात्र अद्यापही त्यांचे देयक अदा करण्यात आलेले नाही. शासनाकडून निधीच उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे शासनाकडून
कामांना उशीर झाल्यास दंड आकारल्या जातो मात्र आता शासनाकडूनच निधी नसल्यामुळे रखडलेल्या कामांना कोण जबाबदार असा सवाल करण्यात आला आहे. दरम्यान, देयके मिळाली नसल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले असून एका कंत्राटदाराने आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केली आहे. आता शासनाला निधी देण्यासाठी किती आत्महत्या हव्या आहेत असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शासनाकडून कामे पूर्ण करण्यासाठी नोटीस देण्यासारखे प्रकार केले जात असून यामुळे कंत्राटादारांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. शासनाने रखडलेली देयके अदा करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. जा पर्यंत निधी दिला जात नाही तोपर्यंत कामे पुढे सुरू केली जाणार नाही असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.
जिल्ह्यातील सर्व विभागांमध्ये ९०० कोटी कामांची देयके मागील वर्षभरापासून रखडली आहेत. परिणामी सर्वच कंत्राटदार अडचणीत आले आहेत. शासनाने कंत्राटदारांना तत्काळ निधी उपलब्ध करून देयके अदा करावी अन्यथा कंत्राटदारांच्या राज्यस्तरीय संघटनेच्या निर्णयानुसार पुढील भूमिका घ्यावी लागेल, असे मत कंत्राटदार निश्चल यंबल यांनी व्यक्त केले.