

Madhya Pradesh minor girl molested in Hingoli
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वुई प्ले अॅपवरून ओळख झालेल्या मध्यप्रदेशातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलासह एका व्यक्तीवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.
हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका भागातील अल्पवयीन मुलाची वुई प्ले अॅपवरून मध्य प्रदेशातील एका भागातील एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. या ओळखी नंतर त्यांनी काही दिवस एकमेकांसोबतच मोबाइलवरून चॅटिंग केले. त्यानंतर संभाषणही सुरु झाले. दरम्यान, हिंगोलीच्या अल्पवयीन मुलाने तिला लग्नाचे अमिष दाखवून हिंगोलीत बोलावून घेतले.
त्यानुसार ती मुलगी घरून निघून थेट हिंगोलीत पोहोचली. त्यानंतर त्या मुलाने १३ जुलै ते १६ जुलै या कालावधीत त्याच्या घरी मुलीस ठेऊन घेतले व तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाशी लग्न करायचे असेल तर माझ्या सोबत संबंध ठेवावे लागतील असे सांगत दीपक नागपूरे याने त्या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान, या प्रकारानंतर त्या मुलीने घरी सोडण्याची विनंती केली. मात्र त्यांनी तिला घरी सोडले नाही. त्यामुळे त्या मुलीने १०० नंबरवर संपर्क साधून मला घरी जायचे आहे मदत हवी आहे असे सांगितले.
त्यावरून तातडीने हिंगोली ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार बाळासाहेब खोडवे, आकाश पंडीतकर, आशिष उंबरकर यांच्या पथकाने त्या मुलीची सुटका करून पोलिस ठाण्यात आले. यावेळी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलासह दीपक नागपुरे याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांच्या पथकाने दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे पुढील तपास करीत आहेत.