

अंबाजोगाई: अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून उमेदवारी मागे घेण्यासाठी 500 रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र देऊनही शब्द पाळला नाही, या आरोपाखाली लोकविकास महाघाडीचे नेते राजकिशोर मोदी व माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यावर फसवणूक व ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची खळबळजनक घोषणा बहुजन विकास मंचचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी केली.
अंबाजोगाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत पोटभरे यांनी थेट आरोप करत सांगितले की, नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधून अनुसूचित जाती महिला प्रवर्गात सौ. किरण विनोद शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे लोकविकास महाघाडीचे उमेदवार पराभूत होतील, या भीतीपोटी राजकिशोर मोदी व पृथ्वीराज साठे यांनी निवडणूक संपल्यानंतर किरण शिंदे यांना ‘पहिल्या पसंतीच्या स्वीकृत नगरसेवक’ म्हणून घेण्याचे लेखी व नोटरी शपथपत्र दिले.मात्र, निवडणूक निकालानंतर दिलेले शपथपत्र धुडकावून लावत किरण शिंदे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतले गेले नाही. हा केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण आंबेडकरी चळवळीचा आणि दलित समाजाचा अपमान व विश्वासघात असल्याचा गंभीर आरोप पोटभरे यांनी केला.
पुढे बोलताना बाबूराव पोटभरे म्हणाले की, राजकिशोर मोदी यांच्या तोंडी शब्दावर आमचा विश्वास नव्हता, म्हणूनच आम्ही लेखी करार करून घेतला. तो करार मोडून मोदी व साठे यांनी राजकीय लबाडी केली असून, ही सरळसरळ फसवणूक आहे. त्यामुळे मोदींवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार, तर पृथ्वीराज साठेंवर भा.दं.वि. 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.
यावेळी पोटभरे यांनी पृथ्वीराज साठे हे कार्यकर्त्यांचा वापर करून जमिनी बळकावण्याचे उद्योग करतात, असा गंभीर आरोप करत, आंबेडकरी समाजाची व जनतेची जाहीर माफी न मागितल्यास लवकरच तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला.
पत्रकार परिषदेत विनोद शिंदे यांनीही मोदी व साठे यांच्यावर हल्लाबोल करताना, हे दोघे अंबाजोगाईतील दोन लबाड लांडगे असून, निवडणुकांपुरते दलित व मुस्लिम समाजाला भूलथापा देऊन वापर करून घेतात, असा आरोप केला. शपथपत्र देऊनही शब्द न पाळल्याने प्रभाग क्रमांक 15 च्या निवडणुकीबाबत उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच राजकिशोर मोदी यांचे स्वीकृत नगरसेवक पद रद्द करून त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, अशी ठोस मागणीही विनोद शिंदे यांनी शासनाकडे केली.
पत्रकार परिषदेला बहुजन विकास मंच व बहुजन विकास मोर्चाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणामुळे अंबाजोगाईच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, आगामी काळात हे प्रकरण कायदेशीर व आंदोलनाच्या पातळीवर अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.