

Inspecting the Jal Jeevan project work while traveling on a two-wheeler
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील माळेगाव शिवारात जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दुचाकी वाहनांवर प्रवास करून पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा राखण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या.
कळमनुरी तालुक्यातील माळेगाव, बिबगव्हाण, कळमनुरी, झरा, तुप्पा, नवखा व शिवणी बु. या गावांना जिल्हाधिकारी गुप्ता, मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, संजय कुलकर्णी, विजय बोरोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे प्रश्न मांडले. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक वितरण प्रणाली, संजय गांधी निराधार योजना आदी योजनांतर्गत प्रलंबित ई-केवायसी तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्वरित निराकरण करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या दप्तर तपासणीसह ई-चावडी, ई-हक प्रणाली, ई-फेरफार प्रकरणांची तपासणी करून ती तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. याशिवाय नागरिकांच्या निवेदनांवर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. तसेच तीन स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून लाभाथ्यर्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.
तुप्पा येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून केवळ वीज जोडणी अभावी नागरिकांना पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावर महावितरणला तत्काळ वीजजोडणी करून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले.