

Bank Association Agitation
हिंगोली : बँकिंग क्षेत्रात पाच दिवसांचा आठवडा तातडीने लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (UFBU) केंद्रीय आवाहनानुसार बुधवारी (दि. १२) हिंगोलीत विविध बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेसमोर झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील विविध बँकांचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
UFBU आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात झालेल्या १२व्या द्विपक्षीय करारात बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याबाबत सहमती झाली होती. मात्र, करार होऊन बराच कालावधी उलटूनही केंद्र सरकारकडून अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, भारतीय रिझर्व्ह बँक, एलआयसी आणि विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू असताना बँक कर्मचाऱ्यांनाच या सुविधेपासून वंचित का ठेवले जात आहे, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यास ग्राहकसेवेवर परिणाम होऊ नये, यासाठी दररोजच्या कामाच्या वेळेत ४० मिनिटांची वाढ करण्यास UFBUने यापूर्वीच सहमती दर्शविल्याचे आंदोलकांनी सांगितले. त्यामुळे सरकारने या मागणीवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ‘आम्हा कर्मचाऱ्यांचा हक्क मिळालाच पाहिजे’, ‘पाच दिवसांचा आठवडा तातडीने लागू करा’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युनियनच्या प्रतिनिधींनी दिला.
निदर्शनात बँक ऑफ इंडिया, एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच अन्य बँकांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. संजय सातव, अनिल दहातोंडे, राहुल पारटकर, नितीन घुगे, शुभम मुंडे, मनोहर पुरी, ओम काळे मांडगे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.