

Hingoli ZP Election News
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या ५२ गटांची आरक्षण सोडत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी ८, अनुसूचित जमातीसाठी ६ तर ओबीसी प्रवर्गासाठी १४ गट आरक्षित झाले. जिल्हा परिषदेच्या राजकारणातील काही दिग्गजांचे गट आरक्षित झाल्याने त्यांना पर्यायी गट शोधावा लागणार आहे किंवा त्यांना निवडणुक रिंगणाच्या बाहेर पडावे लागणार असल्याने मागील तीन वर्षापासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. तर काही दिग्गज माजी सदस्यांना मात्र जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये काहींना हॅटीक साधता येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड याच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरूवातीला अनुसूचित जाती त्यानंतर अनुसूचित जमाती व ओबीसी प्रवर्गासाठी लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असलेले अनिल पतंगे यांचा बाभुळगाव गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने पतंगेंचा पत्ता कट झाला आहे. गोरेगाव गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने माजी महिला व बालकल्याण सभापती रूपाली पाटील गोरेगावकर यांना पर्यायी गट शोधावा लागणार आहे.
आजेगाव गट देखील अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने माजी जि.प.सदस्य गजानन देशमुख यांची अडचण झाली आहे. शेवाळा गटातून शिंदे गटाचे अभय पाटील सावंत तसेच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील यांनी निवडणुकीची तयारी केली होती. परंतु, शेवाळा गट देखील अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने या दोघा दिग्गजांना थांबावे लागणार आहे. आखाडा बाळापुर गट देखील अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने बाजार समितीचे सभापती दत्ता बोंढारे यांना येहळेगाव तुकाराम गटातून ओबीसी प्रवर्गातून निवडणुक लढवावी लागणार आहे. माजी जि.प. सदस्य अंकूश आहेर यांचा जवळा बाजार व पुरजळ हे दोन्ही गट ओबीसीसाठी राखीव झाल्याने आहेर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या राजकारणातील दिग्गज असलेले अॅड. बाबा नाईक यांचा सिद्धेश्वर गट देखील अनुसुचित जमातीसाठी राखीव झाल्याने नाईक यांना पर्यायी गट शोधावा लागणार आहे.
मावळत्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात अजित मगर, अनिल पतंगे, बाळासाहेब मगर यांच्यासह काही दिग्गज सदस्यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने प्रशासनाला जेरीस आणले होते. परंतु, अनिल पतंगे यांचा बाभुळगाव अनुसूचित जाती, अजित मगर यांचा वाकोडी अनुसूचित जमाती तर बाळासाहेब मगर यांचा सिंदगी गट ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या अभ्यासू सदस्यांना देखील आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे.
आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का बसला असला तरी काहींना मात्र आरक्षण सोडतीमुळे पुन्हा निवडणुक लढविण्याची संधी मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनिष आखरे यांचा येहळेगाव सोळंके गट सर्वसाधारणसाठी राखीव झाल्याने त्यांना या गटातून हॅट्रीक साधण्याची संधी मिळणार आहे. संजय दराडे यांचा माथा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने दराडे यांना आपल्या सौभाग्यवतीच्या माध्यमातून सभागृहात जाण्याची संधी मिळणार आहे. डोंगरकड्यातून दिलीप देसाई यांना आपल्या पत्नीच्या माध्यमातून निवडणुकीची संधी आहे. डोंगरकडा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे.
वारंगा फाटा गटातून राजेश्वर पतंगे यांना त्यांच्या सौभाग्यवतीच्या माध्यमातून सभागृहात जाण्याची संधी मिळणार आहे. वारंगा फाटा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. माजी शिक्षण सभापती संजय देशमुख यांना देखील त्यांच्या सौभाग्यवतींच्या माध्यमातून पानकनेरगाव गटातून संधी मिळणार आहे. पानकनेरगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. भांडेगाव गटातून माधव कोरडे, फुलाजी शिंदे, शामराव जगताप यांना देखील आपल्या सौभाग्यवतीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवावे लागणार आहे. भांडेगाव गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे.