

Hingoli Water Supply non-return valve is faulty
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी योजनेचा नॉन रिटर्न वॉल नादुरस्त झाल्यामुळे शहराला सोमवारपासून तीन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले असून नागरीकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शहराला सिध्देश्वर धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. शहरातील सर्व सतरा प्रभागांमधून योग्य दाबाने व नियमितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी पालिका प्रशासनाकडून दक्षता घेतली जाते. प्रत्येक प्रभागात रोटेशननुसार मुबलक पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान, हिंगोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सिध्देश्वर धरणाजवळील पाणी पुरवठा योजनेचा नॉन रिटर्नवॉल नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे पाण्याची गळती वाढली असून शहरातील जलकुंभ भरण्यासाठी मोठा कालावधी लागत आहे.
त्यातून पाणी योजनेच्या विद्युतपंप नादुरुस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारी सदर प्रकार लक्षात आल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या सुचनेवरून पालिकेचे अभियंता भुरके, नगर अभियंता प्रतिक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, यांच्यासह पालिकेचे पथक आज दुपारीच तातडीने सिध्देश्वर येथे रवाना झाले असून पालिकेच्या पथकाकडून दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
सदर दुरुस्तीसाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार असून त्यामुळे बुधवारपर्यंत शहराला पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे. गुरुवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितले.