

Vasmath Aundha Nagnath Road Accident Car Bike Collision
वसमत: वसमत ते औंढा नागनाथ मार्गावरील वाई फाट्याजवळ कार व दुचाकीचा रविवारी (दि.८) रात्री ९. ४० च्या सुमारास भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील शेख मोबीन शेख सलीम (वय २४), शेख आवेज शेख जावेद (वय २३, दोघे रा. बहिरोबाचोंडी) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, बहिरोबा चोंडी येथील शेख मोबीन शेख सलीम, शेख आवेज शेख जावेद हे बांधकाम मजुरीचे काम करतात. रविवारी वसमत येथे दिवसभर मजुरी करून दोघेही रात्री दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. वसमत ते औढा नागनाथ मार्गावरील वाई फाट्याजवळ रात्री ९. ४० च्या दरम्यान औंढा नागनाथकडून येणार्या कारची आणि त्यांच्या दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील शेख मोबीन शेख सलीम, शेख आवेज शेख जावेद (दोघे रा. बहिरोबाचोंडी) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी सहायक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे, भालेराव, संतोष पटवे आदींनी वाहतूक सुरळीत केली. घर काही अंतरावर राहिले असताना अपघात कर्त्या तरुणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.