
Hingoli Varanga Phata Truck Bus Crash
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे आज (दि. २०) सकाळी साडेसात वाजता बसस्थानकासमोर बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रकने बसच्या मागील चाकाजवळ जोराची धडक दिली. यात ४ ते ५ प्रवाशी जखमी झाले. बसचेही नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बस (एम,एच,२० बीएल १७३८ ) कंधार आगाराची असून पुसदकडून नांदेडकडे निघाली होती. बस स्थानकासमोर (आरजे १७ जीए ६०६५) हा ट्रक नांदेडकडून हिंगोलीकडे भरधाव वेगाने जात होता. यावेळी बस स्थानकामधून बाहेर जाणाऱ्या बसला जोराची धडक दिली. यामध्ये बसमधील प्रवासी गणेश किशनराव पवार (अंबाडा), शिवाजी गणपतराव पवार (अंबाळा, ता. हदगाव), गोविंद लक्ष्मण मोहिते (रा. वारंगा फाटा) हे किरकोळ जखमी झाले.
बसच्या खिडक्या तुटल्या असून अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाल्याची फिर्याद बसचे चालक बालाजी बापूराव सावंत यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार शेख करीत आहेत.