

Aundha Nagnath temple devotees crowd
औंढा नागनाथ : देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे तिसऱ्या श्रावण सोमवारी (दि. 11) भक्तांचा महापूर ओसंडून वाहिला. राज्यभरातून हजारो भाविक श्रींच्या दर्शनासाठी दाखल झाले होते.
मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. विशेष पासधारक भाविकांसाठी स्वतंत्र रांगांची सोय करण्यात आली होती. मध्यरात्री वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश बांगर यांच्या हस्ते नागनाथ महाराजांची महापूजा पार पडली. या वेळी संस्थानचे अध्यक्ष वैजनाथ पवार, सुरेंद्र डफळ आदी मान्यवर उपस्थित होते. पहाटे दोन वाजता महापूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
सामान्य भाविकांना पश्चिम द्वारातून प्रवेश देण्यात आला असून, या रांगेतून दर्शनासाठी ३ ते ४ तासांचा वेळ लागत होता. विशेष पासधारकांना उत्तर द्वारातून प्रवेश मिळत होता, ज्यासाठी सुमारे १ ते २ तास लागले.
संस्थान व दानशूर व्यक्तींच्या मदतीने भाविकांसाठी चहा-पाणी व फराळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. रांगेतील उशीर लक्षात घेऊन सुमारे ५० किलो साबुदाणा खिचडी तयार करून भाविकांना वाटप करण्यात आले.
सायंकाळी साडेआठपर्यंत २० हजारांहून अधिक भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. मंदिर परिसर भक्तांच्या "बम बम भोले"च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. श्रावणी सोमवारी औंढा नागनाथ नगरीत भक्ती, श्रद्धा व उत्साह यांचा मिलाफ अनुभवायला मिळाला.