

Hingoli Jawala Bazar Traffic Jam
जवळा बाजार : नागपूर–गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करणारा प्रकल्प असून तो तात्काळ रद्द करावा, अशी ठाम मागणी करत शक्तीपीठ संघर्ष समितीच्या वतीने जवळा बाजार येथे तब्बल एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
आंदोलनादरम्यान शेतकरी नेते संदिप माटेगावकर यांनी सरकारवर तीव्र टीका करताना सांगितले की, शक्तीपीठ महामार्ग हा कोणत्याही प्रकारची मागणी नसलेला आणि अनावश्यक प्रकल्प आहे. हा प्रकल्प रद्द न केल्यास शेतकऱ्यांचा उद्रेक रस्त्यावर दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या महामार्गामुळे विकासाच्या नावाखाली विनाश होत असून पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास होण्याचा धोका आहे, असेही आंदोलकांनी नमूद केले. हजारो झाडांची तोड, मातीचे प्रदूषण तसेच पुराचा धोका वाढण्याची शक्यता असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.
जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली तीव्र भूमिका मांडताना, “आम्ही जीव देऊ, पण आमची वडिलोपार्जित जमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नाही,” असा ठाम इशारा देत शासनाचा निषेध केला. आंदोलनात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
या आंदोलनाचे आयोजन पंडित सूर्यतळ आणि निवृत्ती नरवाडे यांनी केले होते. यावेळी जवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवनाथ कुऱ्हे पाटील, पुष्पक देशमुख, विश्वनाथ सावंत, तानाजी भोसले, गोरख सावंत, बन्सी कदम, हनुमान आहेर, दीपक सोनवणे, लिंबाजी सावंत यांच्यासह असंख्य शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे मत विचारात घेतले जात नाही. सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही. हमीभाव देऊन शेतकरी बळीराजाला सक्षम करण्याऐवजी शक्तीपीठसारखे प्रकल्प आणून त्यांना देशोधडीला लावले जात आहे.
- ज्येष्ठ नेते व माजी सभापती मुनीर पटेल