

Hingoli Police Seven Criminals Tadipar Action
हिंगोली : जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय, अवैध जुगार-मटका तसेच मालमत्ता व शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध हिंगोलीचे पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई हाती घेतली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एकूण ५८ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
सदर गुन्हेगारांकडून वारंवार गुन्हे घडत असून त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५५ अन्वये त्यांच्याविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगोली ग्रामीण, हिंगोली शहर व वसमत यांनी प्राथमिक चौकशी करून संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे सादर केले होते.
प्रस्तावांची सविस्तर छाननी व तपासणी केल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अंतर्गत अधिकारांचा वापर करून संबंधित आरोपींना विविध कालावधीसाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. या आदेशांनुसार काही आरोपींना एक महिना तर काहींना एक वर्षापर्यंत जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खालील सात जणांचा यात समावेश आहे :
१) पुंजाजी बबन जोगदंड (वय २५ वर्षे)
२) नागेश उर्फ नागोराव अशोक पावडे (वय २४ वर्षे)
३) कृष्णा काशिनाथ ढोबळे (वय १८ वर्षे)
४) बालाजी नारायण वानखेडे (वय ४२ वर्षे)
५) माधव किशनराव वानखेडे (वय ४७ वर्षे)
६) केशव खुशाल रीठे (वय ३२ वर्षे)
७) शंकर रामराव रीठे (वय ३४ वर्षे)
या सातही आरोपींना विविध कालावधीसाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.