Sangli Crime : क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटनाला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात सापडला!

हद्दपार गुंड मध्या वाघमोडेस अटक; जत पोलिसांच्या पथकाची गुळवंचीत कारवाई
Sangli Crime News
Published on
Updated on

जत : जत परिसरात दहशत निर्माण करणारा तसेच खंडणी, अपहरण, मारहाण यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला हद्दपार कुख्यात गुंड मधुकर ऊर्फ मध्या दादासाहेब वाघमोडे (वय ४०, रा. गुळवंची, ता. जत) यास जत पोलिसांनी सोमवारी (दि. १५) सायंकाळी अटक केली. गुळवंची येथे एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटनासाठी मध्या येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

मधुकर ऊर्फ मध्या वाघमोडे हा जत परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच तो ‘मोक्का’ कायद्यातील गुन्ह्यात जामिनावर बाहेर आला होता. तसेच जत पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी तो पोलिसांना हवा होता. विधानसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू असताना पोलिस तपासणी पाहून त्याने आपल्या वाहनासह (क्र. एमएच ०६ बीई ४७५१) पलायन केले होते. त्यावेळी त्याच्या वाहनातून तलवार व लोखंडी एकडा जप्त करण्यात आला होता, तेव्हापासून तो फरार होता.

पोलिस अधीक्षक तुषार दोषी, अपर अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली फरार संशयितांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. याच दरम्यान सहायक निरीक्षक बिरप्पा लातुरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मध्या वाघमोडे हा एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटनासाठी गुळवंची येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस उपनिरीक्षक जीवन कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश ओलेकर, योगेश पाटोळे आणि कोंडीबा बंडगर यांचे विशेष पथक तयार करून खासगी वाहनाने घटनास्थळ गाठले व अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यास बंदी असतानाही त्याने आदेशाचे उल्लंघन केल्याने, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास जत पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जीवन कांबळे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news