

हिंगोली : हिंगोली ते वाशीम मार्गावर बासंबा पाटीजवळ पोलिस उपाधीक्षक मयूर रसाळ यांच्या पथकाने शनिवारी छापा टाकून एका कार सह 7.38 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हयातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनी विशेष पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून दररोज अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्यावर छापे टाकले जात आहेत.
दरम्यान, हिंगोली ते वाशीम मार्गावर एका कारमध्ये गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस उपाधीक्षक मयूर रसाळ, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार संदीप जाधव, धनंजय क्षिरसागर, नितीन गोरे, शिवाजी इंगोले यांच्या पथकाने शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका कारची तपासणी केली.
यावेळी कारमधील पोत्यात गुटखा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कारमधील डीबी सिग्नेचर फिनेस्ट पानमसाला, रजनीगंधा पान मसाला, एम सेन्टेड तंबाखू, आरएमडी पान मसाला या गुटख्याची पोती जप्त केली. या शिवाय एक मोबाईल व कार असा 7.38 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी जमादार संदीप जाधव यांच्या तक्रारीवरून बासंबा पोलिसांनी सागर इंदोरीया, जैस्वाल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक संदीप जमादार, संतोष वाढोरे पुढील तपास करीत आहेत.