

जवळाबाजार : कृषीप्रधान देशात शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. मात्र, या आधुनिकतेमुळे एकेकाळी शेतीचा मुख्य कणा असलेला पारंपारिक सुतारकी व्यवसाय आता पूर्णपणे धोक्यात आला आहे. शेतीची लाकडी अवजारे तयार करणाऱ्या कारागिरांवर आज उदरनिर्वाहासाठी इतर व्यवसाय किंवा मजुरी करण्याची वेळ आली आहे.
पूर्वीच्या काळी शेतातील प्रत्येक काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडी अवजारांचाच वापर केला जात असे. शेतकरी वर्षभर लागणारी अवजारे सुतारांकडून बनवून घेत असत. विशेषतः जून महिन्यात होणाऱ्या पेरणीसाठी मे महिन्यामध्ये सुतारांच्या वखारींवर (दुकानात) शेतकरी बांधवांची महिनाभर मोठी गर्दी पाहायला मिळत असे.
कालांतराने आधुनिक युगात नवनवीन यंत्रे आल्यामुळे शेतीची कामे कमी वेळेत होऊ लागली आहेत. पूर्वी सुतारांकडून महिना-महिना वेळ देऊन बनवून घेतली जाणारी नांगर, वखर, तिफन, कोळपे यांसारखी लाकडी अवजारे आता कालबाह्य होत चालली आहेत. शेतात आता मोठ्या प्रमाणावर लोखंडी आणि प्लास्टिकच्या साहित्याचा वापर वाढला आहे. केवळ शेतीच नव्हे, तर घरातील चौकटी, दरवाजे, खिडक्या, रॅक यांसाठी पूर्वी मोठ्या प्रमाणात लाकूड वापरले जात असे. आता या लाकडाची जागा प्लायवूड आणि सिमेंटच्या तयार वस्तूंनी घेतली आहे.
लाकडी वस्तूंचा वापर कमालीचा घटल्यामुळे सुतार व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. यामुळे पारंपरिक कारागिरांच्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीचे लाकडी काम कमी झाल्याने आर्थिक गणित कोलमडल्यामुळे, सुतार समाजातील कुटुंबांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी आता इतर व्यवसायांकडे आणि मजुरीकडे आपला मोर्चा वळवला आहे.