Municipality Council Reservation: हिंगोली जिल्ह्यात तीनही पालिकांवर 'महिलाराज'...
हिंगोली : जिल्हयातील तीनही नगरपालिकांचे आरक्षण सोडत सोमवारी (दि.६) दुपारी जाहिर झाली. हिंगोली पालिकेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिला तर वसमत व कळमनुरी पालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलासाठी आरक्षीत झाले आहे. त्यामुळे आता तीनही पालिकांवर महिला राज येणार आहे. तर आता नगरसेवकपदाच्या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
जिल्हयात हिंगोली, कळमनुरी व वसमत या नगरपालिका असून सेनगाव व औंढा नागनाथ नगरपंचायती आहेत. सेनगाव व औंढा नगरपंचायतीची निवडणूक झाली आहे. तर तीनही नगर पालिकांची निवडणूक होणे बाकी होते. मागील काही दिवसांपासून शासनाकडून पालिका निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्यामुळे स्थानिक पातळीवर इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली होती. मागील पाच वर्षात प्रभाग न फिरणारे इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागात विकास कामांकडे लक्ष देऊन लागले आहेत.
दरम्यान, जिल्हयातील तीनही पालिकांचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण कोणाला सुटणार याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सोमवारी दुपारी आरक्षण सोडत झाल्यानंतर पुरुष इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. तीनही ठिकाणी नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षीत झाले आहे. त्यामुळे इच्छूकांनी आपल्या अर्धांगिणीला राजकारणात उतरविण्याची तयारी सुरु केली आहे.
हिंगोली पालिकेत ओबीसी संवर्गातील महिला उमेदवाराला संधी मिळणार आहे. यापुर्वी माजी नगराध्यक्षा अंजली पातुरकर, माजी नगराध्यक्ष अनिता सुर्यतळ यांच्यानंतर आता तिसऱ्यावेळी महिला उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे. तर वसमत येथे सुमारे २५ वर्षानंतर महिला उमेदवाराला संधी मिळणार असून हिच स्थिती कळमनुरी पालिकेचीही आहे.
वसमत व कळमनुरी पालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या गटातील महिलेस सुटल्यामुळे या ठिकाणी निवडणुकीत चांगलीच चुरस पहावसास मिळणार आहे. तर हिंगोलीत ओबीसी चेहरा कोण असणार याची चाचपणी राजकिय पक्षांकडून सुरु करण्यात आली आहे. एकूणच तीनही पालिकेवर महिलाराज येणार असल्याने पुरुषांची चांगलीच गोची झाली आहे.

