हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली लोकसभेसाठी शुक्रवारी (दि.26) मतदान पार पडले. हिंगोली लोकसभेत महायुती, महाविकास आघाडीसह वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली होती. परंतु रविवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. बी.डी. चव्हाण यांनी, एका ऑडिओ क्लिपद्वारे हिंगोली लोकसभेत बंजारा नेत्यांनी घात केल्याचा आरोप करीत खळबळ उडवली. लोकसभेत पराभव झाल्यास बंजारा नेतेच जबाबदार राहतील, त्यांना समाज माफ करणार नाही, असा इशारा देखील त्यांना दिला.
हिंगोली लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बी.डी. चव्हाण यांनी निवडणूक लढवली. तिरंगी लढतीत डॉ. चव्हाण यांना दलित मतदारांसह बंजारा समाजाचे मोठे पाठबळ मिळाल्याची चर्चा होती. राजकीय जाणकारांनी महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत, वंचितचे डॉ. बी.डी. चव्हाण यांच्यात लढत झाल्याचा अंदाज व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम हे तिसर्या स्थानावर राहतील, असा एक मतप्रवाहही समाज माध्यमावर फिरु लागला आहे. स्पर्धेत असलेले बी. डी. चव्हाण यांनी मात्र, रविवारी स्वतःच्या भ्रमणध्वनीवर स्टेटस ठेवून बंजारा समाजाच्या नेत्यावर गंभीर आरोप केल्याने, पुन्हा एकदा वंचितचे उमेदवार चव्हाण चर्चेत आले आहेत.
त्यांच्या ऑडिओ क्लिपमध्ये मनोहर नाईक, प्रदीप नाईक, संजय राठोड आणि त्यांचे मेव्हणे सचिन नाईक यांच्यामुळेच पराभवाला तोंड द्यावे लागेल. इतर गोरगरीब वंचित, दलित समाज, गोरगरीब बंजारा समाजाचे त्यांनी आभार मानले. परंतू बंजारा समाजाच्या नेत्यांवर मात्र घात केल्याचा आरोप करीत कुर्हाडीचा दांडा, गोतास काळ असे म्हणत नाराजी व्यक्त केली. बंजारा समाजाच्या धनदांडग्यांनी माझा घात केला आहे. पराभव जर झाला तर या लोकांमुळेच होऊ शकतो. त्यामुळे या लोकांना येणारा काळ बंजारा समाज माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
रविवारी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. बी. डी. चव्हाण यांनी बंजारा समाजाच्या नेत्यांकडून घात केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गंभीर टीका केली. निकालापूर्वीच केलेल्या आरोपामुळे डॉ. चव्हाण यांना पराभवाची भीती वाटते काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अत्यंत सुशिक्षित उमेदवार म्हणून डॉ. चव्हाण यांची ओळख आहे. परंतू मतदानाच्या दुसर्या दिवशी त्यांनी बंजारा समाजाच्या नेत्यांवर आरोप केल्याने बंजारा समाजाच्या मतामध्ये फूट पडल्याची शंका या निमित्ताने उपस्थित होऊ लागली आहे.
हेही वाचा