हिंगोली लोकसभा : हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द; शिंदे सेनेकडून बदली उमेदवार जाहीर; कोहळीकरांना तिकीट | पुढारी

हिंगोली लोकसभा : हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द; शिंदे सेनेकडून बदली उमेदवार जाहीर; कोहळीकरांना तिकीट

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : हिंगोली लोकसभा मतदार संघात शिंदेसेनेने अखेर उमेदवार बदलला असून आता हदगाव तालुक्यातील कोहळी येथील बाबुराव उर्फ संभाराव गुणाजी कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहिर झाली आहे. खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलावी अशी मागणी भाजपने केली होती. भाजपच्या दबावापुढे शिंदे सेनेच्या वरिष्ठ नेत्याने लोटांगण घालत कोहळीकर यांना उमेदवारी दिल्याने हेमंत पाटील समर्थकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. हदगाव विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोन्ही वेळा दुसर्‍या क्रमांकाची मते मिळविली आहेत.

हदगाव तालुक्यातील कोहळी येथील असलेले बाबुराव कदम यांनी 1987 पासून राजकिय प्रवास सुरु केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी कोहळी गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक पद भुषविले आहे. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत सन2000 मध्ये सरपंच झाले. नांदेड जिल्हयातील निवघा-तळणी जिल्हा परिषद गटातून ते सन 2002 मध्ये विजयी झाले. सन 2012 पर्यंत त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी सन 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर हदगाव विधानसभा निवडणुक लढविली होती. त्यावेळी त्यांना सुमारे 52 हजार मतदान मिळाले होते. तर सन 2019 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुक लढविली त्यावेळीही त्यांना सुमारे 62 हजार मतदान मिळाले. दोन्ही निवडणुकीत ते दुसर्‍या क्रमांकावर होते. दरम्यान, हिंगोली लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेची (शिंदेगट) असल्यामुळे या ठिकाणी शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. मात्र भाजपाने त्यांच्या उमेदवारीला तिव्र आक्षेप घेऊन नाराजी व्यक्त केली. तर मागील पाच वर्षात विकास कामे केली नसल्याने मतदारांमधूनही त्यांच्या बद्दल नाराजीचा सुर उमटू लागला होता. महायुतीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये हिंगोलीची जागा धोक्यात असल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदेसेनेने तातडीने उमेदवार बदलून त्या ठिकाणी आता हदगाव तालुक्यातीलच बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहिर केली आहे. दरम्यान, कोहळीकर हे गुरुवारी ता. 4 उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

… तर भाजपचा हेतू साध्य होणार?

हिंगोली लोकसभेसाठी भाजपच्या डझनभर इच्छुकांनी मागील दोन ते अडीच वर्षापासून निवडणुकीची तयारी सुरू केली होती. बुथस्तरावर बांधणी देखील केली होती. परंतू वाटाघाटीत पुन्हा हिंगोली लोकसभा शिंदे सेनेच्याच वाट्याला गेला. उमेदवारीची माळ विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या गळ्यात पडली परंतू भाजपने थेट आक्रमक भुमिका घेत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीलाच विरोध करीत उमेदवार बदलण्याची मागणी केली. भाजपच्या अट्टहासापोटी उमेदवार जरी बदलला तरी भाजपाने नेमके काय साध्या केले याचे उत्तर मात्र अद्यापही कुणी देण्यास तयार नाही. हेमंत पाटील यांच्या रूपाने सक्षम उमेदवार असतानाही अत्यंत नवख्या उमेदवारास लोकसभेच्या रिंगणात आणून भाजपचा हेतू साध्य होणार का? असा प्रश्‍न देखील उपस्थित होऊ लागला आहे. निवडणुकीत हेमंत पाटील यांच्याऐवजी पर्यायी उमेदवार देण्यात आल्याने आता भाजपला कोहळीकर यांना जिंकून आणण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

Back to top button