

Hingoli Local bodies elections news
औंढा नागनाथ, पुढारी वृत्तसेवा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सन्मानजनक आघाडी झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेतले.
निवडणुकीची रणनीती बाबत त्यांनी चर्चा केली. औंढा नागनाथ येथे चव्हाण यांनी नुकतीच बैठक घेतली. यावेळी तालुकाध्यक्ष रमेश सानप, संभाजी चव्हाण, विठ्ठल गायकवाड, दिलीप राखुंडे, सुरेश आहेर, शकील अहमद, वसंतराव राखुंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणूक ५२ जार्गावर होणार आहे.
त्यानुसार आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येकी १७ जागा मिळणे अपेक्षित आहे. ज्या तालुक्यांमध्ये पक्षाची ताकद जास्त त्यानुसार जागा वाटपाचा निर्णय होणे अपेक्षित आहे. याच पद्धतीने नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या जागा वाटपाबद्दल ही निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र या निवडणुकीत तीनही पक्षांची सन्मानजनक आघाडी होणे आवश्यक आहे.
निवडणुकीत पक्षाला सन्मान जनक जागा न मिळाल्यास स्वबळावर निवडणुका लढविण्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करावयाची झाल्यास त्यासाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या तिन पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.