

Hingoli Kalmanuri CISF Jawan Missing
आखाडा बाळापूर : बोल्डावाडी (ता. कळमनुरी) गावातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा (CISF) जवान दशरथ उत्तम कऱ्हाळे (वय ३१) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. दिल्ली येथे कर्तव्य बजावत असलेल्या या जवानाचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंता आणि अस्वस्थता पसरली आहे.
दशरथ कऱ्हाळे यांनी आपल्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करत पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि २००७ साली CISF मध्ये भरती झाले. त्यांनी झारखंडमधील रांची येथे सेवा बजावली असून, अलीकडेच त्यांची दिल्ली येथे बदली झाली होती. मे २०२५ मध्ये ते १२ दिवसांच्या सुट्टीवर बोल्डावाडीला आले होते. सुट्टी संपल्यानंतर ते १७ मे रोजी दिल्लीला जाण्यासाठी निघाले. त्यानंतर २८ मे रोजी फलटण येथे भावाला भेटून, १ जूनला भावाने त्यांना बसमध्ये बसवून दिले. त्यानंतर मात्र दशरथ यांचा कोणताही संपर्क झाला नाही.
कुटुंबीयांनी दिल्लीला जाऊन CISF कार्यालयात चौकशी केली, मात्र तेथेही त्यांची कोणतीही माहिती मिळाली नाही. दशरथ यांचा रंग सावळा, उंची ५ फूट ५ इंच, अंगाने सडपातळ असून, हातात टायटनचे घड्याळ आहे. दोन महिन्यांपासून ते बेपत्ता असल्याने कुटुंबीय अत्यंत चिंतेत आहेत. कुटुंबीयांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली असून, या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.