

Kalamnuri school bus accident
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरात स्कूल बसच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ एप्रिलरोजी दुपारी १२.३० ते १२.५० वाजण्याच्या सुमारास वारंगा फाटा ते हिंगोली महामार्गावर हा अपघात झाला होता. साई इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी वाहून नेणारी खासगी बस (एमएच ०२ एक्सए १४८२) भरधाव वेगाने जात असताना रस्त्याच्या कडेला पायी चालत असलेल्या रामराव गोपाळराव कपाळे (रा. गोरलेगाव, ता. हदगाव, जि. नांदेड) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृताच्या नातवाने चंद्रकांत बालाजी पारडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दि. ७ एप्रिल रोजी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर तब्बल चार दिवसांनी गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू आहे.
फिर्यादीत आरोपी चालकाचे नाव व गावाची माहिती उपलब्ध नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, अपघातस्थळावरून पोलिसांनी संबंधित खासगी बस ताब्यात घेतली आहे.
फिर्यादी चंद्रकांत पारडकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर बस खासगी होती की अधिकृत शाळेची बस होती, याची चौकशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बसवर शाळेचे नाव व “स्कूल बस” असे नमूद असल्याने, जर ती शाळेची बस असल्याचे निष्पन्न झाले, तर नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे व सुविधा होत्या का, याची तपासणी करून संबंधितांवर कारवाई होणार का ? याकडेही लक्ष लागले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वारंगा मदत केंद्राचे जमादार शेख बाबर करीत आहेत.