

Hingoli Jaljeevan Mission Scheme MLA Pragya Satav
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा :
महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवून त्यांच्या घरात नळाद्वारे शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात ६२८ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिली. परंतु, पाच वर्षांनंतरही केवळ २२५ योजनाच पूर्ण झाल्या. त्याही योजनांच्या कामात अनियमितता असल्याचा आरोप करीत आमदार प्रज्ञा सातव यांनी सोमवारी सभागृहात जलजीवन योजनेच्या निकृष्ट कामावर बोट ठेवून महिलांच्या डोक्यावरील हंडा कधी उतरणार असा सवाल केला.
सोमवारी विधान परिषदेत आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी हिंगोलीसह राज्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या निकृष्ट कामांवर बोट ठेवले. त्या म्हणाल्या की, २०१९ मध्ये शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजना हाती घेतली.
या योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात ६२८ गावांतील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली. पाच वर्षांत केवळ २२५ योजनांची कामे पूर्ण झाली. ज्या गावात योजनांची कामे पूर्ण झाली त्या गावात अद्यापही पाणी उपलब्ध नाही. काही ठिकाणी कमी खोलीच्या विहिरी खोदण्यात आल्या. पाईपलाईन नियमानुसार अंथरण्यात आली नाही. पाईपलाईनसाठी रस्ते खोदण्यात आले. कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत असल्याचे सांगत आमदार प्रज्ञा सातव यांनी पाणीप-रवठा योजनांच्या निकृष्ट कामांवर बोट ठेवत या योजना किती काळ टिकणार असा प्रश्न उपस्थित केला.
काही ठिकाणी तर चक्क जुन्या कुंभांनाच जलवाहिन्या जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित योजनांचे काम कधी पूर्ण होणार, संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन होणार का, समितीचा अहवाल कधी येणार असा प्रश्न उपस्थित करत जलजीवन योजनेचे वाभाडे काढले. त्या म्हणाल्या की, सहाव्या वर्षीही लाडक्या बहिणींच्या डोक्यावरील हंडा खाली उतरलेला नाही. ग्रामीण भागात महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. अनेक गावांत कामांची गुणवत्ता निकृष्ट असल्याच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हिंगोली जिल्ह्यात जलजीवन योजनेच्या कामात अनियमितता झाली आहे. कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधून आंदोलने झाली. यामध्ये प्रामुख्याने नांदुरा येथील ग्रामस्थांनी शोले स्टाईलने जलकुंभावर चढून आंदोलन केले तर सावळी बहिणाराव येथील महिलांनी जलजीवन योजनेच्या पाणी पुरवठा योजनेचे पाईप काढून फेकले तरीही प्रशासन जागे झाले नाही असे सांगत आमदार प्रज्ञा सातव यांनी संताप व्यक्त केला.