

हिंगोली : जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यात अपयशी ठरलेल्या चार कंत्राटदारांना जिल्हा परिषद प्रशासनाने दणका दिला आहे. वारंवार सूचना आणि नोटिसा देऊनही कामांना गती न दिल्याने छत्रपती संभाजीनगर, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील चार कंत्राटदारांना तब्बल पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पुढील पाच वर्षे या कंत्राटदारांना हिंगोली जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभागाच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
सेनगाव तालुक्यातील बामणी (खु.) येथील पाणीपुरवठा योजनेची १२ महिन्यांची मुदत संपून चार वर्षे उलटली, तरी केवळ २५ टक्के काम झाले. याच कंत्राटदाराकडील पिंपरी लिंग, लिंग पिंपरी आणि रेपा येथील कामांची प्रगतीही अवघी १२ टक्के आहे. त्यामुळे बीड येथील निखिल नाईकवाडे यांच्यावर कारवाई करण्यात आली.
हिंगोली तालुक्यातील भटसावंगी येथे १८ महिन्यांच्या मुदतीत पूर्ण होणाऱ्या कामाला चार वर्षांत केवळ २३ टक्के प्रगती साधता आली. याप्रकरणी जिंतूर येथील नामदेव घुले यांच्या भगवानबाबा कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्यात आले. औंढा नागनाथ तालुक्यातील टाकळगव्हाण येथे चार वर्षांनंतरही काम केवळ एक टक्का पूर्ण झाले. परभणी येथील प्रशांत दहिफळे यांच्यावर त्यामुळे कारवाई झाली. तर सेनगाव तालुक्यातील उटीपूर्णा येथे १८ महिन्यांची मुदत संपूनही केवळ सहा टक्के काम झाल्याने छत्रपती संभाजीनगर येथील श्री अष्टविनायक ग्रुपवर कारवाई करण्यात आली.
शासन नियुक्त अंमलबजावणी संस्था वॅपकॉस (WAPCOS)च्या तपासणी अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात ६८५ जलजीवन योजना मंजूर असून अनेक कामे अद्याप अपूर्ण आहेत. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या या कारवाईमुळे रखडलेल्या योजनांच्या पूर्ततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.