

MSEDCL Load Shedding
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करावे, कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी, प्रलंबित वीजविषयक प्रश्न मार्गी लावावेत तसेच सोलार योजनांची कामे वेळेत पूर्ण करावीत, या प्रमुख मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सुमारे एक ते दोन तास चाललेल्या या आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांसह संबंधित अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. हिंगोली जिल्ह्यात महावितरणमध्ये कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेत होत नसल्याचा आरोप संघटनेने केला. तसेच अतिरिक्त भारनियमनामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत ते तात्काळ बंद करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
यावेळी कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना रात्रीची सिंगल फेज वीज तातडीने उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांच्या सोलार योजनांची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढणे तसेच महावितरणमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून रखडलेली कामे पूर्ण करावीत, अशा मागण्याही करण्यात आल्या.
आंदोलनानंतर अधीक्षक अभियंत्यांनी संघटनेच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, दिलेल्या आश्वासनानुसार निर्धारित कालावधीत कार्यवाही झाली नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, रमेश जाधव, अशोक जयस्वाल, विशाल पौळ, रावसाहेब घुमनर, अशोक पौळ, भाऊराव पौळ, गजानन पौळ, दामोदर घुमनर, प्रभात पौळ, बबन पौळ, पवन पौळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.