Hingoli News : रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेची खाजगी वाहनातच प्रसुती

औंढा नागनाथ तालुक्यातील प्रकार
baby News
रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेची खाजगी वाहनातच प्रसुतीPudhari File Photo
Published on
Updated on

हिंगोली : जवळा बाजार येथे रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने एका अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी सुरुच असताना रविवारी (दि.१९) पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. औंढा तालुक्यातील काशीतांडा येथील एका गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने खाजगी वाहनातून हिंगोलीकडे आणताना वाहनातच प्रसुती झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

हिंगोली जिल्हयात आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकांवर कोणाचेही नियंत्रण नाही, कधी डिझेल नसल्यामुळे रुग्णवाहिका बंद असल्याचे सांगितले जाते तर कधी चालक नसल्याचे सांगितले जात आहे. २६ मे रोजी जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याचे सांगितल्यानंतर प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला खाजगी वाहनाने हिंगोलीला पाठविण्यात आले. मात्र, दुर्देवाने त्या अर्भकाचा मृ्त्यू झाला. या प्रकरणी तिघांवर कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, रविवारी औंढा नागनाथ तालुक्यातील काशीतांडा येथील इंदूर राठोड या महिलेला प्रसुतीकळा येत होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी औंढा नागनाथ येथील रुग्णवाहिका उपलब्ध नसून सुमारे दिड तासांचा कालावधी लागत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, इंदूर यांना अधिकच त्रास होत असल्याने त्यांना तातडीने खाजगी वाहनाद्वारे औंढा नागनाथकडे आणले जात होते. मात्र रस्त्यातच त्यांचा प्रसुती झाली.

दरम्यान, रस्त्यातच प्रसूती होत असल्याने त्यांच्यासोबत असलेल्या महिला घाबरून गेल्या. त्यांनी कशीबशी प्रसूती केल्यानंतर वाहन थेट हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणून या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. महिलेची सुखरूप प्रसूती झाल्यामुळे गंभीर प्रसंग ओढवला नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहे. हिंगोली जिल्हयासाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका धावतात तरी कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे या प्रकाराबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

'माझ्या वहिनी इंदूर राठोड यांना प्रसूती कळा येत असल्याने रुग्णवाहिकेसाठी संपर्क केला'. मात्र, औंढा येथील रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगितले. किमान दिड तास लागेल असेही सांगण्यात आले. त्यामुळे खाजगी वाहनाने येत असतांना रस्त्यातच प्रसुती झाली. वेळीच निर्णय घेतल्याने कठीण प्रसंग टळला. आरोग्य विभागाने याप्रकाराकडे लक्ष दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया रुग्णाची नातेवाईक अर्चना जाधव यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news