

हिंगोली : जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तत्काळ बंद करावे, कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या आंदोलन करताच प्रशासन चांगलेच नरमले. त्यानंतर लेखी आश्वासन देऊन नवीन ट्रान्सफाॅर्मर देऊन रात्री सिंगलफेज वीजपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
जिल्ह्यात शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्न गंभीर असून या प्रश्नाकडे विज कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. या शिवाय सौर प्रकल्पाची कामेही पूर्ण केली जात नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून रात्रीच्या वेळी होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकरी व गावकरीही अडचणीत सापडले आहेत तसेच हिंगोली तालुक्यातील कलगाव व भांडेगाव येथे रात्रीच्या वीजपुरवठा नसल्याने गावकऱ्यांचे हाल होत आहेत.
या प्रश्नावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, रमेश जाधव, अशोक जयस्वाल, विशाल पौळ, रावसाहेब घुमनर, अशोक पौळ, भाऊराव पौळ, गजानन पौळ, दामोदर घुमनर, प्रभात पौळ, बबन पौळ, पवन पौळ यांनी मंगळवारी वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे वीज कंपनीचे अधिकारी नरमले. अधिकाऱ्यांनी कलगाव व भांडेगाव येथे नवीन ट्रान्सफाॅर्मर बसवून वीज पुरवठा सुरळीत केला जाईल तसेच रात्री सिंगलफेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर दोन तासांनी ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानुसार वेळेत कार्यवाही झाली नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.