Hingoli agriculture crisis : कामाचे उद्‌घाटन अन्‌‍ दुष्काळ पाहणीचा फार्स

पालकमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचा रोष, मदत जाहीर करण्याची मागणी
Hingoli agriculture crisis
हिंगोली : हाताळा येथे विकास कामांच्या पाहणीदरम्यान मार्गदर्शन करताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ.pudhari photo
Published on
Updated on

हिंगोली : जिल्ह्यात एका बाजूला शेतकरी तीव्र दुष्काळ आणि सोयाबीन पिकाच्या नुकसानीमुळे संकटात सापडला असताना, दुसरीकडे पालकमंत्री विविध विकासकामांचे थाटामाटात उद्‌घाटन व विकास कामांची पाहणी करीत असून त्यांच्या या कृतीचा क्रांतीकारी शेतकरी संघटनेने तिव्र निषेध नोंदविला आहे. पालकमंत्र्याच्या विरोधात यापुढे तिव्र आंदोलन उभारण्याचा इशारा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी दिला आहे.

हिंगोली जिल्हयात दुष्काळ सदृष्य परिस्थती आहे. मागील एक महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नसल्याने सोयाबीन उत्पादनात मोठी घट येणार असून कापसाची वाढ खुंटली असल्याने पाते व बोंडे लागणे कठीण आहे. ज्या भागात पाते व बोंडे लागली त्या भागात उष्ण व दमट वातावरणामुळे पातेगळ होऊ लागली आहे. जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.

Hingoli agriculture crisis
Parbhani Banjara Morcha : बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी आक्रमक

दरम्यान, पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी सेनगाव तालुक्‍यातील हाताळा व ताकतोडा परिसरात विकास कामांची पाहणी केली. एकीकडे जिल्हा दुष्काळाच्या खाईत असतांना पालकमंत्र्यांकडून विकास कामांची केली जाणारी पाहणी शेतकऱ्यांसाठी संतापाचा विषय बनली आहे. या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी प्रतिक्रिया देत पालकमंत्र्याच्या या भुमीकेचा निषेध केला.

जिल्हयात दुष्काळजन्य परिस्थिती आणि शासनाकडून अपुऱ्या मदतीमुळे हवालदिल झालेल्या शेतकरी महिलेने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. मात्र, प्रशासनाकडून व सरकारकडून योग्य मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना पीकविमा आणि दुष्काळी मदत मिळवून देण्याऐवजी ज्या कामांमध्ये कमिशन आणि टक्केवारी मिळते, त्याच कामांची उद्घाटने व पाहणी थाटामाटात केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. लोकप्रतिनिधींनी या प्रकारचे उद्घटनांचे कार्यक्रम व विकास कामांची पाहणी कार्यक्रम तातडीने थांबवून सर्वप्रथम शेतकऱ्यांना आर्थिक मदत व दिलासा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक तीव्र होईल, असा इशारा कावरखे व पतंगे यांनी दिला.

Hingoli agriculture crisis
PMAY Chhatrapati Sambhajinagar : पीएम आवास योजनेत २१०० लाभार्थ्यांची रक्कम जमा
  • पालकमंत्री झिरवाळ यांनी बुधवारी हाताळा येथे विविध विकास कामांची पाहणी केली तसेच ताकतोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर सेनगाव येथे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर मन्नास पिंपरी, केंद्रा आदी गावांमध्ये सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. एकीकडे विकास कामांचे उद्‌घाटन करून फावल्या वेळेत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांसाठी आपण किती तत्पर आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांकडून करण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news