

Hingoli Crime News: Crime against a youth who threatened to make a screenshot of a video call viral
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला आता मला का बोलत नाहीस अशी विचारणा करून व्हिडिओ कॉलवर बोलतानाचा स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर हट्टा पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीचे तिच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अशर आफाक या तरुणासोबत मैत्री झाली होती. दोघेही एकाच वर्गात असल्यामुळे ती तरुणी अभ्यासाच्या निमित्ताने अशर याला बोलत होती.
मागील एक वर्षापासून ते बोलत होते. यावेळी व्हिडिओ कॉलवर बोलतांना अशर याने त्या तरुणीचा स्क्रीनशॉट काढून घेतला. दरम्यान, अशर याचे वागणे बरोबर नसल्याने तरुणीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते. मात्र तू आता माझ्याशी का बोलत नाही अशी तो वारंवार विचारणा करीत होता.
मात्र तरुणीने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. गुरुवारी सकाळी त्याने तरुणीला महाविद्यालयात गाठून तू माझ्याशी का बोलत नाही तुझा व्हिडिओ कॉलच्या वेळी घेतलेला स्क्रीनशॉट व्हायरल करतो अशी धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने गुरुवारी सायंकाळी हट्टा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अशर आफाक (रा. नेर. ता. पुसद, जि. यवतमाळ) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या पथकाने अशर यास अटक केली असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.