Hingoli Bribe | लाख येथे २८ हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील घटनेने खळबळ
 Bribe Case
प्रातिनिधीक फोटो (File Photo)
Published on
Updated on

Headmaster caught taking bribe

औंढा नागनाथ : शिक्षकाला मिळालेल्या घरभाडे भत्त्यातून ५० टक्के रक्कमेची मागणी करत २८ हजार रुपये लाच स्वीकारताना औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील मधोमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष बबनराव कढणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका शिक्षकाला वेतनामध्ये वार्षिक ५८ हजार १२० रुपये इतका घरभाडे भत्ता मिळाला होता. या रकमेपैकी ५० टक्के म्हणजेच २९ हजार ६० रुपये देण्याची मागणी मुख्याध्यापक संतोष कढणे यांनी केल्याचा आरोप आहे. मागितलेली रक्कम न दिल्यास संबंधित शिक्षक मुख्यालयात राहत नसल्याचा अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवून त्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 Bribe Case
Hingoli news | हट्टा येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य जळून खाक

या प्रकरणी संबंधित शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या पडताळणीदरम्यान मुख्याध्यापक कढणे यांनी २८ हजार रुपयांची लाच मागितल्याचे व ती स्वतः स्वीकारणार असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार ५ मार्च रोजी हिंगोली-नांदेड मार्गावरील खटकाळी बायपास परिसरात आयान पान सेंटरसमोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून २८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना संतोष कढणे यांना पथकाने रंगेहाथ पकडले.

 Bribe Case
Hingoli news | हिंगोलीला मिळणार राज्यसभेचा खासदार

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक कदम आणि पोलिस उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सपोनि विजय शुक्ला, युनूस शेख, राजाराम फुफाटे, रविंद्र वरणे, भगवान मंडलिक, विनोद पुंडगे, शिवाजी वाघ व अकबर शेख यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुलभा राऊत करत आहेत.

अंगझडतीत विविध साहित्य जप्त
मुख्याध्यापक कढणे यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून मोबाईल फोन, आधार व पॅनकार्ड, वाहन परवाना, दोन बँकांचे एटीएम कार्ड, ब्रिझा कारची चावी आणि रोख १०० रुपये अशी सामग्री आढळून आली.

 Bribe Case
Hingoli Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार

घरझडतीचे आदेश
संतोष कढणे हे वाशिम येथील वृंदावन पार्क, लेडी हार्डिंग रोड, गजानन मंदिराजवळ राहत असल्याने त्यांच्या निवासस्थानी घरझडती घेण्याबाबत वाशिम येथील एसीबी पथकाला सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news