Aundha Nagnath Jal Samadhi | केळी तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

सिद्धेश्वर धरणातील पाणी सोडण्याची मागणी; २० ते २५ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट
Aundha Nagnath Keli Lake Water Demand
केळी तलावात सिद्धेश्वर धरणाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले.Pudhari
Published on
Updated on

Aundha Nagnath Keli Lake Water Demand

औंढा नागनाथ : औंढा नागनाथ तालुक्यातील केळी येथे केळी तलावात सिद्धेश्वर धरणाचे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवार (दि. १२) जलसमाधी आंदोलन केले. सकाळी नऊ वाजल्यापासून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनस्थळी दाखल झाले होते. पाणी उपलब्ध न झाल्यास परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातील पाणी उपसा करून केळी येथील तलावात सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी ८ सप्टेंबर रोजी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, मागणी मान्य न झाल्याने जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

Aundha Nagnath Keli Lake Water Demand
Hingoli News: हिंगोलीतील धरणग्रस्तांवर अन्याय, प्रशासनाचा 'तो' अहवाल रद्द करा; पुनर्वसन मंत्र्यांकडे मागणी

केळी तलावातील पाण्यावर परिसरातील सुमारे २० ते २५ गावे अवलंबून आहेत. यामध्ये पार्डी सावळी, सावळी बुद्रुक, केळी, केळी तांडा, येळी, उडेगाव, हिवरखेडा, रामेश्वर, दवडगाव, लांडाळा, उखळी, चिंचोली निळोबा, साळणा, आनखळी, गोजेगाव, जलालपूर, देवसडी, वाडी आदी गावांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, केळी तलावातील पाणीसाठा साधारण डिसेंबर-जानेवारीपर्यंतच टिकतो. त्यानंतर फेब्रुवारीपासून पावसाळा सुरू होईपर्यंत परिसरातील पिण्याच्या पाण्याचे बहुतांश स्रोत कोरडे पडतात. परिणामी नागरिकांसह जनावरे आणि शेतीसाठीही पाण्याचे मोठे संकट निर्माण होते.

Aundha Nagnath Keli Lake Water Demand
Hingoli News | जप्त रेती साठ्यातून घरकुल लाभार्थ्यांना मिळणार पाच ब्रास मोफत रेती!

तलावात पाणी उपलब्ध राहिल्यास या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे सिद्धेश्वर धरणातील पाणी तातडीने उपसा करून केळी तलावात सोडावे, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनात एकनाथ नागरे, गंगाराम घुगे, आसाराम घुगे, अमोल सांगळे, विलास आघाव, विठ्ठल सांगळे, बालाजी सांगळे, अरुण फड, भास्कर आघाव, रामप्रसाद आघाव, नितीन आघाव, सचिन आघाव यांच्यासह २० ते २५ शेतकरी सहभागी झाले होते.

Aundha Nagnath Keli Lake Water Demand
Hingoli News : अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाकडून जप्त!

दरम्यान, औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनस्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून केळी तलावात पाणी सोडण्याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news