Hingoli Farmer Death | पार्डी सावळी येथे आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याने जीवन संपविले

सोयाबीनचे पीक वाया गेले; डोक्यावर कर्जाचा बोजा, सांगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
 Aundha Nagnath Farmer Crisis
सूरज सांगळेPudhari
Published on: 
Updated on: 

Aundha Nagnath Farmer Crisis

औंढा नागनाथ: सततची दुष्काळी परिस्थिती, शेतातील सोयाबीनचे पीक वाया जाणे आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा, अशा आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या औंढा नागनाथ तालुक्यातील पार्डी सावळी येथील २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने जीवन संपविले. ही घटना शनिवारी (दि.२४) सकाळी उघडकीस आली. सूरज श्यामराव सांगळे असे मृत तरुणाचे नाव आहे या घटनेमुळे पार्डी सावळी गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज सांगळे आणि त्यांच्या वडिलांवर विविध बँकांचे कर्ज होते. चालू वर्षातील प्रतिकूल हवामान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील सोयाबीनचे संपूर्ण पीक वाया गेले. त्यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशा संपुष्टात आली. दुसरीकडे, घराच्या बांधकामासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे आव्हानही कुटुंबासमोर उभे राहिले होते.

 Aundha Nagnath Farmer Crisis
Aundha Nagnath Crime | जावयाला धोंडे जेवण पडले महागात; चुलत मेहुण्यांकडून हल्ला, जीवे मारण्याची धमकी

शेतीतून उत्पन्न मिळत नसताना कर्जाचा भार वाढत असल्याने सूरज गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. कर्जाची परतफेड कशी करायची, याबाबत तो वडिलांकडे वारंवार विचारणा करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच कर्जवसुलीसाठी होत असलेल्या तगाद्यामुळे त्याची चिंता वाढली होती.

या आर्थिक विवंचनेतून सूरजने मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. अवघ्या २१ वर्षांच्या तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूने सांगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news