

Aundha Nagnath 4.5 Richter Scale Earthquake
औंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी परिसरात शनिवारी सकाळपासून भूकंपाचे लहान-मोठे धक्के जाणवले. सकाळी ७.४६ वाजल्यानंतर सव्वादहा वाजेपर्यंत एकूण नऊ धक्के जाणवले. यातील सर्वात मोठा धक्का ४.५ रिश्टर स्केलचा असल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे अनेक नागरिक खबरदारी म्हणून घराबाहेर पडले.
सकाळपासूनच भूगर्भातून छोटे-मोठे आवाज येत होते. त्यानंतर धक्के जाणवू लागले. पिंपळदरीसह जामगव्हाण, आमदरी, राजदरी, सोनवाडी, कंजारा, पूर, वसई, गडाळा, लाख, मेथा, वारंगा, काकडदाबा, फुलदाबा, जलालदाबा, तांमटीताडा, लोहरा आणि लोहरा किल्ला परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले.
शनिवारी जाणवलेल्या धक्क्यांचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील गडाळा येथे नोंदविण्यात आला. यापूर्वी गडाळ्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील वसई येथे भूकंपाचा केंद्रबिंदू नोंदला गेला होता. त्याआधी लोहरा परिसरातही भूकंपाचा केंद्रबिंदू आढळला होता.
गेल्या काही वर्षांपासून औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यांतील विविध गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा आणि वापटी येथेही भूकंपाचे केंद्रबिंदू नोंदविले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील अनेक गावे भूकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शनिवारी झालेल्या नऊ धक्क्यांपैकी दोन धक्के मोठे, तर सात धक्के तुलनेने सौम्य होते. वारंवार जाणवणाऱ्या या भूकंप मालिकेबाबत शासनस्तरावर ठोस उपाययोजना आणि सखोल अभ्यासाची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.