

Young man killed in accident
आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर ते रुद्रवाडी मार्गावर आखाडा बाळापूर शिवारात भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.५) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालका विरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आखाडा बाळापूर येथील तरुण बळीराम पवार (२४) हा सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापुर ते रुद्रवाडी मार्गावर एका ठिकाणी कामासाठी जात होता. यावेळी आखाडा बाळापूर शिवारामध्ये पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने बळीराम यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, जमादार पंढरी चव्हाण, बालाजी जोगदंड, शिवाजी पवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या बळीराम यास उपचारासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून बळीराम यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
याप्रकरणी विश्वनाथ पवार यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक नागोराव पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जमादार पंढरी चव्हाण पुढील तपास करीत आहेत. या अपघाताच्या घटनेमुळे पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बळीराम पवार यांच्या मृत्यूने गावकऱ्यातून हळहळ व्यक्त होत आहे.