हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील आडोळ येथे 10 वर्षीय मुलीस घरात बोलावून विनयभंग करणाऱ्या 60 वर्षाच्या वृद्धाविरुध्द सेनगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
सेनगाव तालुक्यातील आडोळ येथे एक कुटुंब रविवारी शेतात कामासाठी गेले होते. त्यांच्या दोन लहान मुली घरी होत्या. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन्ही बहिणी घराबाहेर खेळत होत्या. त्या ठिकाणी राहणाऱ्या रामा गणपत दुभळकर (वय 60) याने एका 10 वर्षीय मुलीस घरात बोलावून मुलीचा विनयभंग केला. दुसऱ्या मुलीने आरडओरड केल्याने वृद्धाने तेथून पळ काढला.
दरम्यान, सायंकाळी पीडित मुलीचे कुटुंबिय शेतातून घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने मुलींना सोबत घेऊन रात्री थेट सेनगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी रामा दुभाळकर याच्या विरुध्द विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपाधीक्षक संजय हिबारे, पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांनी घटनास्थळी पाहणी केली. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर रामा दुभाळकर फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.
हेही वाचा