

हिंगोली : मराठवाडा म्हटले की, दुष्काळ, पाणीटंचाई, चाऱ्याची कमतरता आणि शेतीसमोरील असंख्य अडचणी अशीच प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. परंतु या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कळमनुरी तालुक्यातील हिंगणी येथील युवकाने जिद्द, नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर यशस्वीरीत्या दुग्ध व्यवसाय उभा केला आहे. महादेव घुगे या जिद्दी युवकाने दुग्ध व्यवसायातून महिन्याकाठी दीड लाखाचे उत्पन्न सुरू केले आहे.
हिंगणी येथील महादेव विश्वनाथ घुगे हे उच्चशिक्षित आहेत. गावात त्यांची वडिलोपार्जित शेती देखील आहे. परंतु, दिवसेंदिवस शेतीचा व्यवसाय घाट्यात जात असल्याने शेतीला पुरक असा जोड व्यवसाय करण्याचा निर्णय महादेव घुगे यांनी घेतला. त्यांनी होल्स्ट्रीयन फिजीयन जातीच्या 20 गायी विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला.
शिस्तबद्ध, सक्षम आणि आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसायाला सुरुवात करीत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा गोठा बांधून कमी मनुष्यबळात प्रभावी व्यवस्थापन करण्यावर त्यांनी भर दिला. दररोज त्यांना 400 लिटर दुधाचे उत्पादन मिळते. ते दूध ते हिंगोली येथील देवकी डेअरीला विकतात. दुधाला 40 ते 45 रुपये प्रतिलिटरचा दर मिळतो.
महिन्याकाठी खर्च वजा जाता त्यांच्या हातावर दीड ते पावणेदोन लाख रुपये निव्वळ नफा उरतो. त्यांना या दुग्ध व्यवसायाच्या कामात त्यांचे बंधू संतोष घुगे, पत्नी यांचा हातभार मिळतो आहे. अभ्यासू वृत्ती व अथक परिश्रमाच्या जोरावर महादेव घुगे यांनी दुग्ध व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे. त्यांचा हा व्यवसाय इतरांना देखील प्रेरणादायी ठरतो आहे.
दुग्ध व्यवसायाला ओला व सुका चारा महत्त्वाचा मानला जातो. महादेव घुगे यांनी चारा टंचाईवर मात करण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा मुरघास साठवून ठेवण्याचे नियोजन केल्याने त्यांनी चारा टंचाईवर मात केली आहे. कुटूंबाच्या एकजुटीने हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीला पूरक जोडधंदा केल्यास समाजातील बेरोजगारी दूर होईल असा विश्वास महादेव घुगे यांनी व्यक्त केला आहे.